नाशिक – कार खरेदी पोटी कर्ज घेवून परतफेड न करता वाहनाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत भारतीय स्टेट बँकेच्या थत्तेनगर शाखेस ११ लाखास गंडविण्यात आले असून, अपहार करण्याच्या उद्देशाने वाहनमालकाने बनावट दस्तऐवज तयार करून कारची परस्पर परराज्यात विल्हेवाट लावल्याने हा प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामदेव भरत धनकर (रा.गणेशनगर,गंगापूररोड मुळ सरूळ फाटा,विल्होळी) असे संशयीताचे नाव आहे. बँकेचे व्यवस्थापक ज्योतिष दिनेश सुधाकर (रा.गंगापूररोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार नामदेव धनकर यांनी सन.२०१८ मध्ये स्टेट बँकेच्या थत्तेनगर शाखेकडून फोर्डच्या इकोस्पोर्ट या कारचे कर्ज प्रकरण सादर केले होते. त्यानुसार अकरा लाख रूपयांचे कर्ज मंजूर झाल्याने त्यांनी एमएच १५ जीएफ ८३३५ कार खरेदी केली होती. मात्र कर्जाची वेळेवर परतफेड न केल्याने बँकेने चौकशी केली असता सदर वाहनाची परस्पर विल्हेवाट लावल्याचे समोर आले. संशयीताने स्व:ताच्या फायद्यासाठी अपहार करण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तीच्या मदतीने बँकेची दिशाभूल करून खोटे दस्तऐवज बनवून परवानगी न घेता कार मध्यप्रदेशातील भोपाळ येथे रवाना केल्याचे निष्पन्न झाले आहे.अधिक तपास सहाय्यक निरीक्षक नितीन पवार करीत आहेत.