नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वाहन खरेदी विक्री व्यवाहारात एकाने सव्वा लाखास गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. खरेदी केलेल्या वाहनाच्या कर्जाची रक्कम मुळ मालकास अदा न करता संशयिताने वाहनाचा परस्पर अपहार केल्याने हा प्रकार पोलिसात पोहला असून याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निखील वाघ (३५ रा.महाकाली चौक, सिडको) असे फसवणुक करणाºया संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी अहमदनगर जिह्यातील सखाराम होनाजी वरे (रा.बलठण पो.मवेशी ता.राजूर अकोले) यांनी तक्रार दाखल केली आहे. वरे यांच्या मालकिच्या बोलेरो सिटर या वाहनाचा सन.२०२१ मध्ये व्यवहार केला होता. १३ जून रोजी फायनान्सच्या कर्जाची सव्वा लाखाची रक्कम आठ दिवसात आणून देतो असे सांगून संशयिताने वाहन ताब्यात घेतले होते. मात्र दोन वर्ष उलटूनही संशयिताने फायनान्सची रक्कम दिली नाही. तसेच कर्जाचा भरणा केला नाही. त्यामुळे बॅकेने तगादा लावल्याने वरे यांनी माहिती घेतली असता संशयिताने वाहनाचा अपहार केल्याचे समोर आल्याने त्यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास पोलिस नाईक आवारे करीत आहेत.
सातपूरमध्ये मायलेकाची डॉक्टरला मारहाण
सोसायटीच्या वाहन पार्किंगवरून मायलेकाने घरात घुसून एका डॉक्टरला मारहाण केल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील कामगारनगर भागात घडली. या घटनेत डॉक्टर जखमी झाला असून याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उर्मिला लोखंडे व तिचा मुलगा अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी डॉ.अमरिश देशपांडे यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयित मायलेक व तक्रारदार डॉक्टर एकाच सोसायटीत वास्तव्यास असून त्यांच्यात वाहन पार्किंगच्या कारणातून वाद आहे. गुरूवारी (दि.१७) रात्री मायलेकाने वाहन पार्किंगच्या वादाची कुरापत काढून डॉक्टरच्या घरात शिरून त्यास शिवीगाळ व दमदाटी करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत डॉक्टर जखमी झाले आहेत. अधिक तपास हवालदार बेंडकुळे करीत आहेत.
Nashik Crime Cheating Theft Doctor Beaten