नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाताळच्या सुट्टीनिमित्त विदेश दौऱ्यावर जाण्यास इच्छुक असलेल्या वकीलाच्या मुलाला बनावट विमान तिकीटे देऊन लाखाचा गंडा घालण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात परिचित एजंट दाम्पत्यानेच ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टचे विश्वस्त तथा वकील दीपक पाटोदकर यांनी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. त्यानुसार अॅम्बल हॉलिडेज एजन्सीसह संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुप अनिल सुगंधी, अनया अनुप सुगंधी उर्फ पौर्णिमा महाले (रा.दोघे नाशिक) व सुरज माथुर (रा.मुंबई) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी सप्तशृंगी निवासीनी ट्रस्टचे विश्वस्त अॅड. दीपक पाटोदकर यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. अॅड पाटोदकर यांचा मुलगा आर्यन हा हरियाणा येथे एलएलबीचे शिक्षण घेत आहे. तर त्याचा मित्र विश्वजीत थोरात हा नेदरलॅण्ड देशातील अॅमस्टरडम येथे शिक्षण घेत आहे. थोरात याने नाताळच्या सुट्टीत आर्यनला नेदरलॅण्ड येथे फिरण्यासाठी बोलावल्याने ही फसवणुक झाली आहे. संशयित दांम्पत्य विमान प्रवास तिकीट पुरविण्याचा व्यवसाय करतात. जुना मुंबई आग्रा रोडवरील हॉटेल रामाहेरिटेज भागात अॅम्बल हॉलिडेज नावाची त्यांची एजन्सी आहे.
अॅड. पाटोदकर यांनी पूर्वी संबधीताच्या माध्यमातून विदेश दौरे केले आहे. तसेच ते मित्राचे नातेवाईक असल्याने अॅड. पाटोदकरांनी यांनी २९ नोव्हेंबर रोजी संबधीतांशी संपर्क साधला होता. यावेळी मुंबई – अॅमस्टरडॅम – मुंबई या प्रवासासाठी तिकीट आणि विजा बाबत चौकशी करण्यात आली होती. अनुप सुगंधी यांनी ९१ हजार १५० रूपये खर्च सांगितला होता. त्यातील १४ हजार १५० रूपये हे व्हिसा,विमा व अन्य खर्चाबाबत कल्पना देण्यात आली होती. दोन दिवसानंतर तिकीटाच्या तारखा फार कमी उपलब्ध असल्याचे सांगण्यात आल्याने अॅड.पाटोदकर यांनी १४ हजार १५० रूपये आणि मुलाचे कागदपत्र संबधीतांना आॅनलाईन पाठविले. के.एल.एम रॉयल एअरलाईन्सचे तिकीट स्वस्त असल्याचे व बॅगेज रक्कम नसल्याचे सांगण्यात आलेले असतांनाही संशयितांनी अॅड.पाटोदकर यांच्याकडून ७७ हजाराची रक्कम मागितली. यावेळी तात्काळ रक्कम न दिल्यास तिकीटाचे पैसेही वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने अॅड.पाटोदकर यांनी स्व:ता व अन्य मित्राच्या माध्यमातून ही रक्कम संबधितांना आॅनलाईन अदा केली.
सलग पाठपुराव्यानंतर गेल्या सोमवारी (दि.५) संशयितांनी के.एल.एम.रॉयल एअरलाईनचे तिकीट संबधितांनी व्हाटसअप आणि ई मेल वर पाठविले. त्यात मुबईहून अॅमस्टरडॅम येथे जाण्याची तारीख २६ डिसेंबर तर परतीच्या प्रवासाची तारीख ६ डिसेंबर आढळून आली. सदर तारीख चुकीची असल्याने अॅड.पाटोदकर यांनी तिकीटाचा बुकींग रेफरन्स नंबरच्या माध्यमातून पडताळणी केली असता हा बनाव उघड झाला. पाटोदकर यांनी तात्काळ संबधीताशी संपर्क साधून चूक निदर्शनास आणून दिली असता त्यांनी दोन पीएनआर एकाच वेबसाईडवरून केले असल्याने ही चुक झाली असून २४ तासात कन्फर्म होईल याची खात्री दिली. तीन दिवस उलटूनही तिकीटाचा प्रश्न न सुटल्याने पाटोदकर यांनी संबधीकडे वेबसाईड कंपनी अधिकाºयांबाबत विचारणा केली असता त्यांनी मुंबईस्थीत संशयित सुरज माथूर यांच्याशी बोलणे करून दिले.
यावेळी माथूर यांनी तिकीट कन्फर्म करून देतो अशी खोटी ग्वाही दिली. परंतू पाटोदकर यांनी खात्री करण्यासाठी तिकीट बुकिंग कंपनीच्या आॅफिसीयल वेबसाईटमधून दिल्ली येथील अधिकाºयांशी संपर्क साधला असता फसवणुकीचा हा प्रकार समोर आला. ध्रुव वोरा या अधिकाºयाने थेट हे तिकीटच बनावट असून माथूर नामक कुणीही कर्मचारी नसल्याचे सांगितल्याने पाटोदकर यांना धक्काच बसला. त्यांनी तात्काळ संबधीताशी संपर्क साधला असता त्यांनी चुक मान्य करीत पैसे परत करण्याची ग्वाही दिली. मात्र त्यानंतर संशयितांनी गाशा गुंडाळल्याने अॅड. पाटोदकर यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मन्सुरी करीत आहेत.
Nashik Crime Cheating Fake Air Tickets FIR