नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भागीदारीतील मत्सव्यवसायात एकाने दोघा भागीदारांना सुमारे २० लाखांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. कुठलीही कल्पना न देता परस्पर संशयिताने करार रद्द केल्याने हा वाद विकोपाला गेला असून याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात विश्वासघातासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इम्रान हनिफ शेख (३५ रा. गणेशनगर, वडाळागाव) असे फसवणुक करणा-या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी स्वप्निल भारद्वाज पगारे (रा.संसरीगाव, देवळाली कॅम्प) यांनी तक्रार दाखल केली आहे. शेख याने कश्यपी धरणातील मत्सव्यवसायाचा ठेका मिळविला होता. या व्यवसायासाठी मोठी आर्थिक उलाढाल करावी लागणार असल्याचे संशयिताने सांगितल्याने पगारे आणि कृष्णा भाऊसाहेब थेटे यांनी भागिदारीचा प्रस्ताव मांडला होता. भागीदारीत व्यवसाय करण्याचे ठरल्याने ऑगष्ट २०२१ मध्ये तिघांनी भागीदारी पत्र तयार केले होते. या मोबदल्यात दोघा भागिदारांकडून देवळाली कॅम्प येथील स्टेट बँकतून काढलेले २० लाख १५ हजाराची रक्कम स्विकारण्यात आली होती. मात्र संशयित शेख यांनी परस्पर धरणाचा करार रद्द केला. भागीदारीतील व्यवसाय असल्याने त्यांनी दोघांना याबाबत माहिती देणे तसेच घेतलेले पैसे देणे अपेक्षीत असतांना त्यांनी परस्पर व्यवसाय बंद केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक जाधव करीत आहेत.