नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरात लग्नसराई जोरदार सुरू असून त्याचा गैरफायदा चेनस्मॅचर्स घेत आहेत. त्यामुळेच शहरात चेनस्नॅचिंगच्या आणि चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. या चेनस्नॅचर्सने माजी महापौरांच्या पत्नीला लक्ष्य केले आहे. आडगाव नाका येथील लंडन पॅलेस येथून हितेशा वाघ यांच्या गळ्यातील दागिने चोरांनी लांबविले. याप्रकरणी वाघ यांनी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. त्यानुसार जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हितेशा वाघ या माजी महापौर यतीन वाघ यांच्या पत्नी आहेत. विवाह सोहळ्यासाठी त्या आडगाव नाका परिसरातील लंडन पॅलेस येथे गेल्या होत्या. विवाह समारंभ आटोपल्यानंतर त्या लंडन पॅलेसच्या पार्किंगमध्ये आल्या. त्यांना घेण्यासाठी त्यांच्या मुलाने कार त्यांच्या जवळ आणली. त्या कारमध्ये बसत असतानाच पाठीमागून दुचाकी आली. या दुचाकीवरील चेनस्नॅचर्सने क्षणार्धात वाघ यांच्या गळ्यातील ७ तोळे वजनाचे मंगळसूत्र आणि दीड तोळ्याची सोनसाखळी ओरबाडली. त्यानंतर तातडीने या स्नॅचर्सनी तेथून पोबारा केला. ही बाब कळताच वाघ यांनी आरडाओरडा केला. स्थानिक काही जणांनी चोरट्यांचा पाठलाग केला पण चोरटे पसार झाले. याप्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक अशोक पाथरे हे तपास करीत आहेत.
Nashik Crime Chain Snatching EX Mayor Wife