नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पाण्याचा जार न दिल्याने टोळक्याने जातीवाचक शिवीगाळ करीत एकास बेदम मारहाण केल्याची घटना औद्योगिक वसाहतीत घडली. या घटनेत जार विक्रेता जखमी झाला आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समाधान गुंजाळ, निखील गुंजाळ, अभिषेक गुंजाळ (रा.सर्व उपेंद्रनगर, सिडको) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी साहेबराव नाना अहिरे (रा.राणा प्रताप चौक, लेखानगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. आहेर यांचा औद्योगिक वसाहतीत पाणी पुरविण्याचा व्यवसाय असून, बुधवारी (दि.२८) सकाळी ते नेहमी प्रमाणे पाण्याचे जार पोहचविण्यासाठी औद्योगिक वसाहतीत गेले असता ही घटना घडली.
वालमार्ट पेंट कंपनी भागात ते जार पुरवित असतांना संशयितांनी त्यांच्याकडे पाण्याच्या जारची मागणी केली. मात्र संशयिताकडे मागिल थकबाकी असल्याने अहिरे यांनी जार देण्यास नकार दिल्याने संशयितांनी जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी करीत त्यांना मारहाण केली. याबाबात विविध कलमांसह अनु.जाती जमाती अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक आयुक्त देशमुख करीत आहेत.