नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात गेल्या काही दिवसांपासून आत्महत्येचे सत्र सुरू आहे. आज एका बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. एका बांधकाम कंपनीने बांधकामाची रक्कम थकविल्याने हा बांधकाम व्यावसायिक आर्थिक अडचणीत आला होता. त्यातूनच ही आत्महत्या केली आहे. हेमंत विनायक पवार (वय ५४, रा. प्रसन्न बंगला, चेतना नगर) असे आत्महत्या केलेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे.
इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत पवार यांनी आपल्या घरात विष प्राशन केले. त्यानंतर त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना १८ मार्च रोजी त्यांचे निधन झाले. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांना सुसाईड नोट सापडली. त्यात अधिक माहिती समोर आली आहे.
पवार यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की, बदलापूर येथील ऑर्चिड हाऊसिंग इन्फ्रा एलएलपी या कंपनीच्या इमारतीचे काही काम २०१६ साली केले होते. त्यावेळी कंपनीने काही रक्कम अदा केली. मात्र, उर्वरित पैसे दिले नाहीत. ते थकल्याने पवार यांनी न्यायालयात दावा दाखल केला आहे. मात्र, न्यायालयाकडूनही दिलासा मिळत नसल्याने ते आणखी आर्थिक अडचणीत आले. अखेर या नैराश्येपोटीच त्यांनी आत्महत्या केली, असे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.
पवार यांच्या पत्नी प्रभा यांनी याप्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्या तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे की, ऑर्चिड हाऊसिंग इन्फ्रा एलएलपी कंपनीचे कश्यप मेहता, शिवाजी इरमाळी, सुरेश जैन, सुनील कोठारी, मयंक जैन यांनी बांधकामाची मोठ्या प्रमाणात रक्कम थकविली. याद्वारेच त्यांनी हेमंत पवार यांना आत्महत्येस प्रवृत्त केले. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nashik Crime Builder Suicide Police