नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कार्यालयीन कामकाज आटोपून घराकडे निघालेल्या बांधकाम व्यावसायिकास पिस्तूलचा धाक दाखवत लुटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत ६६ लाख ५० हजार रूपयांची रोकड लांबविण्यात आली आहे. चालकाने कट रचून साथीदाराच्या मदतीने ही लूट केल्याचा अंदाज बांधला जात आहे.
याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नाशिक शहरात राज्यपाल आणि मुख्यमंत्र्याचा दौरा असतानाच ही घटना घडल्याने पोलिस यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बांधकाम व्यावसायिक कन्हैय्यालाल मनवाणी (रा.होलाराम कॉलनी) यांचे पंडीत कॉलनीत कार्यालय आहे. मंगळवारी (दि.१५) सायंकाळी ते कार्यालयीन कामकाज आटोपून आपल्या स्विफ्ट कारमधून घराकडे जात असतांना ही घटना घडली. संशयित चालक देविदास मोहन शिंदे (रा. सातपूर) याच्यासमवेत ते होलाराम कॉलनीच्या दिशेने प्रवास करीत असतांना जुने पोलिस आयुक्तालय तथा परिमंडळ एक उपायुक्त कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर अचानक चालकाने कार थांबविली. तेथे एक जण वाहनात बसला. कारमध्ये बसलेल्या इसमाने थेट मनवाणी यांना पिस्तूल लावत वाहन महामार्गाच्या दिशेने चालकास दामटण्यास लावले.
विल्होळी शिवारातील जैन मंदिर भागात मनवाणी यांना घेवून जात पिस्तूलधारी संशयिताने त्यांच्या हातातील जमीन खरेदी विक्रीची सुमारे ६६ लाख ५० हजार रूपये असलेली पिशवी हिसकावून घेतली. यावेळी मनवाणी यांना दमदाटी करून वाहनातून उतरवून देत दोघा भामट्यांनी पोबारा केला. मनवाणी यांनी कसेबसे घर गाठून रात्री सरकारवाडा पोलिस ठाण्यात आपबिती कथन केल्याने पोलिस यंत्रणा कामाला लागली.
वरिष्ठांकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आल्याने तात्काळ सरकारवाडा पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळासह कार्यालय आणि महामार्गाकडे जाणाºया मार्गावरील सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातून संशयितांचा माग काढला जात आहे. वर्दळीच्या परिसरात लुटमारीचा प्रकार घडल्याने व्यावसायीकांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान राज्यपाल कोशारी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी नाशिक दौºयावर असल्याने पोलिस यंत्रणा दिवसभर बंदोबस्तात होती. हीच संधी साधत चालकाने कट रचून आपल्या साथीदाराच्या मदतीने ही लुट केल्याचा अंदाज बांधला जात असून अधिक तपास सरकारवाडा पोलिस करीत आहेत.
Nashik Crime Builder Loot FIR Theft 66 Lakh