नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील भाजपा पदाधिकाऱ्याकडून खंडणी उकळणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी रडारवर घेतले असून, या टोळक्याविरोधात आता मोक्कान्वये कारवाई केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. राजकीय आरोप – प्रत्यारोपानंतर या टोळक्याविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याने वेगवेगळ्या चर्चेस उधाण आले आहे.
भाजपचे पदाधिकारी विक्रम नागरे यांना वेळोवेळी धमकी देत सराईत गुन्हेगारांनी दहा लाख रुपये उकळल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोरआला. याप्रकरणी संशयित अक्षय युवराज पाटील (रा. श्रमिकनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तर, नागरेंना अडवून जीवे मारण्याची धमकी देत खंडणी उकळून त्यांचे फलक फाडून घरावर दगडफेक केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल झाला. त्यामध्ये सराईत गुन्हेगार दीपकभालेराव उर्फ डी भाई, रोशन काकड, गणेश लहाने, गौरव उर्फ गुलब्या घुगे, अनिरुद्ध शिंदे व जया दिवे आदी संशयितांचा समावेश आहे. यातील बहुतांश संशयितांना पोलिसांनी अटक केली होती.
पोलिस व न्यायालयीन कोठडीनंतर या संशयितांना जामीन मंजूर झाल्याचे समजते. यासर्व सराईतांवर मोक्का प्रस्तावित करण्यात आला होता. त्यास गुरुवारी (दि.१) रात्री पोलिस आयुक्तांनी मंजूरी दिल्याचे कळते. संशयितांची धरपकड सुरू करण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. संशयित सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याविरोधात खुनासह विविध गंभीर गुन्हेदाखल आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या आरोप – प्रत्यारोपानंतर या टोळक्याविरोधात मोक्काची कारवाई करण्यात येत असल्याने त्यामागे राजकीय पार्श्वभूमी असल्याची जोरदार चर्चा आहे.
Nashik Crime BJP Leader Threat MACOCA Police