सिडकोत टोळक्याची तरुणास मारहाण
जुन्या भांडणाच्या रागातून सिडकोतील संभाजी चौकात टोळक्याने एका घरावर हल्ला चढवित तरूणास बेदम मारहाण केली. या घटनेत जीवे मारण्याची धमकी देत टोळक्याने तरूणास फरशीचा तुकडा मारून फेकल्याने तो जखमी झाला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम अहिरे व वैभव आव्हाड यांच्यासह सात आठ अनोळखी मुलांचा हल्लेखोर टोळक्यात समावेश आहे. याप्रकरणी मयुर विलास पाटील (२४ रा.संभाजी चौक,सिडको) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. संशयित टोळक्याने जुन्या भांडणाच्या रागातून रविवारी (दि.८) पाटील याच्या घरासमोर येवून शिवीगाळ करीत दरवाजास दगड मारली. यावेळी पाटील घराबाहेर आला असता त्यास संशयितांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यातील एकाने फरशीचा तुकडा मारून फेकल्याने तो जखमी झाला असून घराच्या दरवाजाचेही नुकसान झाले आहे. पाटील कुटूंबियाना जीवे मारण्याची धमकी देत टोळके पसार झाले असून अधिक तपास उपनिरीक्षक किरण शेवाळे करीत आहेत.
कॅम्पमध्ये गैरसमजातून तिघांची एकास मारहाण
पाळीव कुत्र्यास घरात चल असे म्हटल्याच्या गैरसमजातून तिघांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना हाडोळा भागात घडली. या घटनेत जीवे मारण्याची धमकी देत त्रिकुटाने लोखंडी गज व दांडक्याचा वापर केल्याने श्वानमालक जखमी झाला असून याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिंग्या उर्फ साहिल मुनावर लियाकत अली सय्यद ,राशीद अकबर अली सय्यद व साहिल उर्फ चिंग्या लियाकत अली सय्यद (रा.सर्व कासम शेख चाळ,दे.कॅम्प) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी फिरोज अजीज खान (४८ रा.डेव्हलपमेंट एरिया,हाडोळा) यांनी तक्रार दाखल केली आहे. शनिवारी (दि.७) ही घटना घडली. फिरोज खान हे आपल्या पाळीव श्वानास घरात बोलवत असतांना रस्त्याने जाणाऱ्या संशयितांनी गैरसमजातून वाद घालत शिवीगाळ केली. यावेळी संतप्त त्रिकुटाने थांब तुझा बेत पाहतो असे म्हणून लोखंडी गज व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या घटनेत खान जखमी झाले असून अधिक तपास हवालदार मिरजे करीत आहेत.