नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे नाशिक शहर हे असुरक्षित बनल्याचे स्पष्ट होत आहे. शहर परिसरात खुनांचे सत्र सुरू आहे. आज दिवसाढवळ्या अंबड औद्योगिक वसाहतीत एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या १८ दिवसातील हा आठवा खुन आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदकुमार आहेर असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अंबड औद्योगिक वसाहतीतील आहेर इंजिनिअरींग या खासगी कंपनीत ते प्रॉडक्शन मॅनेजर होते. कंपनीचे मालक असलेल्या आहेर यांचे ते पुतणे असल्याचे सांगितले जाते. आज सकाळी ते किर्लोस्कर कंपनीजवळील आहेर इंजिनीअरींग कंपनीत आले. त्यानंतर अज्ञात चार ते पाच व्यक्तींनी त्यांच्यावर धारदार शस्राने सपासप वार केले. त्यानंतर या अज्ञात व्यक्ती तेथून तत्काळ पसार झाल्या. या हल्ल्यात आहेर हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या हत्येमुळे अंबड औद्योगिक परिसर हादरला आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. पोलिसांनी श्वानपथकासह विविध बाबींद्वारे साक्षी, पुरावे गोळा करण्यास प्रारंभ केला आहे. अधिक तपास सुरू आहे.
नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून खुनाचे जोरदार सत्र सुरू आहे. विशेष म्हणजे, दिवसाढवळ्या खुनाचे प्रमाण वाढले आहे. विविध वैयक्तिक कारण आणि वैमनस्यामुळे हे खुन होत असल्याचा खुलासा नाशिक पोलिसांकडून केला जात आहे. मात्र, भरदिवसा प्राणघातक हल्ला होत असल्याने नाशिककरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या दोन दिवसात तर ३ जणांवर प्राणघातक हल्ले झाले आहेत.