नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दरोडेखोरांनी रात्रीच्या सुमारास घरात शिरून तीक्ष्ण हत्याराने एका वृद्धाचा निर्घृणपणे खून केल्याची घटना शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीत घडली आहे. बच्चू सदाशिव कर्डीले (६८) असे मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाचे नाव आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (दि.२५) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीतील एक्सलो पॉईंट येथे घडलेल्या या घटनेने नाशिक हादरले आहे. कर्डिले यांचे शेतकरी कुटुंब असून ते अंबड लिंक रोडवरील एक्सलो पॉईंट येथे शेतात राहतात. ते राहत्या घरी शुक्रवारी एकटेच होते. घरातील इतर कुटुंबीय नातेवाईकाच्या लग्न असल्याने हळदीच्या कर्यक्रमाला गेलेले असताना दरोडेखोरांनी हा हल्ला केला अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
यात चार ते पाच हल्लेखोर होते. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ते घरात शिरले. यावेळी कर्डिले झोपण्याच्या तयारीत होते. त्यांनी दरोडेखोरांना प्रतिकार केला असता धारदार हत्याराने कर्डीले यांच्या हल्लेखोरांनी डोक्यावर धारधार हत्याराने गंभीर वार करून ठार मारले. यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त करून सुमारे पाच ते दहा लाख रुपयांची रोकड लुटून पोबारा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळतात अंबड पोलीस तसेच शहर पोलीस आयुक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते.
गुरुवारी रात्री नाशिक शहरापासून जवळच पुणे महामार्गावर वडगाव पिंगळा गावात एका घरात असाच दरोडा टाकून दरोडेखोरांनी दागिन्यांची लूट केली होती. मायलेकाला जबर मारहाण करत घरात बांधून ठेवले होते. नाशिक ग्रामीण पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास लागत नाही तोच पुन्हा नाशिक शहरातसुद्धा दरोडेखोरांनी वृद्धाचा निर्घृणपणे खून करून रोकड लुटल्याची घटना घडली. नाशिकमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांनी पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
Nashik Crime Ambad MIDC Dacoity Murder Theft