नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनसेचे कार्यकर्ते याज्ञिक नंदू शिंदे (वय २७, रा. माऊली लॉन्स, नवीन नाशिक) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी (दि.१३) सायंकाळच्या सुमारास गंगापूररोडवरील सिरीन मेडोजमधील ट्रॉपिकाना सोसायटीत ही घटना घडली. आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याज्ञिक शिंदे दुपारी जेवणास घरी आले नसल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरू केला. गंगापूररोडवरील ट्रॉपिकाना सोसायटीच्या सी विंगमधील दहाव्या मजल्यावर ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, त्यांना कोणतीही चिठ्ठी आढळून आली नाही. याच सोसायटीच्या बी विंग मध्ये आठ दिवसांपूर्वी अभ्यासाच्या ताणतणावातून एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. दरम्यान, वर्षभरापूर्वी याज्ञिक शिंदे यांच्या वडिलांनीही आत्महत्या केली होती. त्यांचा चार दिवसांपूर्वीच प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम झाला. आता वडिलांच्या पाठोपाठ मुलानेही आत्महत्या केल्याने त्याच्या कुटुंबासह मित्र परिवार हादरला आहे.