नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – म्हसरुळच्या आधाराश्रमातील तब्बल ७ मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपी हर्षल मोरे याचा सध्या कसून तपास सुरू आहे. पोलिसांनी या तपासासाठी दोन स्वतंत्र पथके तयार केली आहेत. त्यातील एक पथक मोरेच्या सटाणा येथील घरी झडतीसाठी गेले होते. या पथकाला मोरेच्या घरातून एअरगन सापडली आहे. ही एअरगन पथकाने जप्त केली आहे. आता ही गन फॉरेन्सिक विभागाकडे पाठविण्यात आली आहे. त्याच्या अहवालातून अनेक बाबी स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत.
म्हसरुळ येथील रो हाऊसमध्ये मोरे आधाराश्रम चालवित होता. तेथील तब्बल ७ मुलींचे मोरेने लैंगिक शोषण केले. या मुलींना तो घाणेरडे व्हिडिओ दाखवित असे. तसेच, त्यांच्यावर बलात्कार करीत असते. या सर्व विद्यार्थिनी अल्पवयीन आहेत. तसेच, आदिवासी आणि अत्यंत दुर्गम भागातील आहेत. हा गुन्हा उघडकीस आल्यानंतर राज्यभरातच खळबळ उडाली आहे. राज्य सरकारनेही याप्रकरणाची दखल घेत चौकशी समिती स्थापन केली आहे. या संबंधीचा विस्तृत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
दरम्यान, मोरे सध्या पोलिस कोठडीत आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे. मात्र, तो तपासात सहकार्य करीत नसल्याचे सांगितले जात आहे. याची दखल घेत आता पोलिसांनी त्याची चौकशी इन कॅमेरा सुरू केली आहे. त्याचबरोबर एका पथकाला त्याच्या सटाणा येथील घरीही पाठविण्यात आले. या पथकाने त्याच्या घराची चांगलीच झडती घेतली. घरामध्ये पथकाला एअरगन सापडली आहे. ही एअरगन त्याने कुठून आणि का आणली, त्याचा वापर तो कशासाठी करीत होता यासह इतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या गनची परवानगी त्याने घेतली आहे का, त्याचा परवाना आहे का, या एअरगनचा वापर झाला आहे का, झाला असेल तर कधी यासह अन्य बाबींची खातरजमा आता या पथकाला करायची आहे. सर्वप्रथम या पथकाने एअरगन ताब्यात घेऊन ती फॉरेन्सिक विभागाकडे पाठविली आहे. विभागाचा अहवाल आता महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
एअरगनचा वापर लहान मुलींना धमकावण्यासाठी आणि त्यांचे लैंगिक शोषण करण्यासाठी केला जात असल्याचे सांगितले जाते. याची खातरजमा करण्यासह अनेक बाबी सध्या पोलिसांना पडताळून पहायच्या आहेत. आधाराश्रमाचीही सध्या झडती घेतली जात आहे. तेथेही काही पुरावे मिळण्याची अपेक्षा पोलिसांना आहे. त्याशिवाय त्याचा मोबाईलही पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्याचीही तपासणी सध्या सुरू आहे.
Nashik Crime Adharashram Accused Home Police Investigation
Girl Molestation Rape