नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कारवर आदळून दुचाकी चालक ठार झाला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव ट्रक टर्मिनल परिसरात हा अपघात झाला. याप्रकरणी आाडगाव पोलीस ठाण्यात कारचालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धिरज छबू भालेराव (वय ४७, रा.मॉडेल कॉॅलनी,शिवाजीनगर जेलरोड) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. भालेराव गुरूवारी ओझर कडून नाशिकच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. (एमएच १५ एचके ४४३७) या दुचाकीने ते नाशिकच्या दिशेने प्रवास करीत असतांना ट्रक टर्मिनल परिसरातील हॉटेल माऊली समोर पुढे जाणारी स्विफ्ट कार (एमएच १५ एफटी १६९७) वरील चालकाने अचानक ब्रेक लावल्याने हा अपघात झाला. अचानक कार थांबल्याने पाठीमागून येणारी दुचाकी कारवर धडकली. या अपघातात दुचाकीस्वार भालेराव गंभीर जखमी झाले होते.उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी त्यांचा पुतण्या शुभम भालेराव यांनी दिलेल्या तक्रारीवरून कारचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार पाटील करीत आहेत.
साईबाबनगरमध्ये घरफोडी
सिडकोतील साईबाबानगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी ७३ हजाराच्या दागिण्यांवर डल्ला मारला. त्यात सोन्याचा गंठण हारचा समावेश आहे.याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयवंत नारायण राजोळे (रा.साईबाबानगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. राजोळे कुटूंबिय मकरसंक्राती निमित्त आपल्या गावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी (दि.१४) रात्री राजोळे यांच्या घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले सुमारे ७३ हजार रूपये किमतीचे गंठण हार चोरून नेला. अधिक तपास हवालदार आजगे करीत आहेत.