मालट्रकला धडक दिल्याने स्कूटीस्वार ठार
ऊसाने भरलेल्या मालट्रकला धडक दिल्याने स्कुटीस्वार ठार झाला. हा अपघात मखमलाबाद लिंकरोडवर झाला. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दशरथ रावजी खालकर (३० रा.शंकरनगर,तवलीफाटा) असे मृत स्कुटीस्वाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खालकर हे रविवारी (दि.४) सायंकाळच्या सुमारास लिंकरोडने आपल्या स्कुटीवर (एमएच १५ बीपी ३२७८) प्रवास करीत असतांना ही दुर्घटना घडली. भरधाव स्कुटीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. राऊ हॉटेल भागातील वजनकाट्या समोर भरधाव स्कुटी पुढे जाणाऱ्या ऊसाने भरलेल्या मालट्रकवर आदळली. या अपघातात खालकर गंभीर जखमी झाले होते. तर स्कुटीचेही मोठे नुकसान झाले होते. खालकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हवालदार चौधरी यांच्या तक्रारीवरून मृत स्कुटीचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक व्ही.डी.आहिरे करीत आहेत.
विहीरीत उडी घेत तरुणाची आत्महत्या
विहीरीत उडी घेत २६ वर्षीय तरूणाने आत्महत्या केल्याची घटना आडगाव शिवारातील पीर मळा भागात घडली. युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर त्र्यंबक राऊत (२६ रा. राऊतमळा, मेडिकल कॉलेज जवळ वसंतदादा नगर) असे आत्महत्या करणाºया युवकाचे नाव आहे. सागर राऊत याने मंगळवारी (दि.६) अज्ञात कारणातून परिसरातील प्रिमियम मार्केटच्या पाठीमागील संतोष माळोदे यांच्या शेतातील विहीरीत उडी घेतली होती. ही बाब निदर्शनास येताच अग्निशमन दलाच्या मदतीने त्यास पाण्याबाहेर काढले असता तो मृतअवस्थेत होता. अधिक तपास उपनिरीक्षक अरूण पाटील करीत आहेत.
Nashik Crime Accident Death Young Suicide