नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील महावितरणचा लाचखोर अतिरीक्त कार्यकारी अभियंता संजय मारुती घालपे हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात सापडला आहे. धालपे हा क्लास वन अधिकारी आहे. तब्बल १७ हजार रुपयांची लाच घेताना तो रंगेहाथ पकडला गेला आहे. आता याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
नाशिक एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, एका बिल्डींगच्या साईटवर ट्रान्सफॉर्मर बसविणे तसेच, प्रत्येक इलेक्ट्रिक मीटरचे कनेक्शन देणे असे काम होते. या कामासाठी धालपे याने २० हजार रुपयांची मागणी केली. बिल्डिंग साइटवर ४१ वीज मीटर, ट्रान्सफार्मर बसवणे या कामास मंजुरी देण्याचे अधिकार घालपेकडे होते. त्याबदल्यात त्याने ही लाच मागितली. ५०० रुपये प्रति मीटर प्रमाणे ४१ मीटरचे २० हजार ५०० रुपये द्यावे, अशी मागणी त्याने केली. तडजोडी अंती ही रक्कम १७ हजार रुपये करण्यात आली. त्यानंतर एसीबीकडे ही तक्रार आली. एसीबीने सापळा रचला. आणि अखेर धालपे हा लाच घेताना रंगेहाथ सापडला. धालपे हा महावितरणच्या द्वारका उपविभागातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता आहे. लाचेप्रकरणी आता त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, एसीबीने आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा. त्यासाठी अँन्टी करप्शन ब्युरो नाशिकच्या
0253 2578230 किंवा टोल फ्रि क्रं. 1064 या क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन एसीबीने केले आहे.
Nashik Crime ACB Corruption Bribe Executive Engineer Trap
Mahavitaran MSEDCL