नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गॅस कनेक्शनचे बिल भरण्याच्या बहाण्याने सायबर भामट्यांनी शहरातील दोघांच्या बँक खात्यावर डल्ला मारला. मोबाईल अॅप इन्स्टॉल करण्यास भाग पाडून व लिंकच्या माध्यमातून ही फसवणुक केली असून या घटनांमध्ये सुमारे साडे सोळा लाख रूपये ऑनलाईन लांबविण्यात आले आहेत. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाको टिसी थॉमस (रा.महात्मानगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. या घटनेत थॉमस याच्यासह यश कसात या युवकाची फसवणुक करण्यात आली आहे. संबधीताशी दि.६ ते ९ जून दरम्यान संपर्क साधण्यात आला होता. थॉमस यांना गॅस कनेक्शनचे बिल भरण्यासाठी एमएनजीएल अॅप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्यास भाग पाडण्यात आले. या अॅपच्या माध्यमातून भामट्यांनी थॉमस यांच्या बँक खात्यातील ८ लाख ८२ हजार २९० परस्पर ऑनलाईन लांबविले.
तर यश कसात यांच्या बँक व क्रेडिट कार्डची माहिती मिळवित भामट्यांनी त्यांच्या खात्यातील ७ लाख ६५ हजार ४६९ रूपये परस्पर अन्य खात्यात वर्ग करून काढून घेतले या दोन्ही घटनांमध्ये १६ लाख ४७ हजार ७५९ रूपयांची फसवणुक झाली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.