नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक मध्ये मधील उमेदवार वसंत गिते यांना विधान सभा निवडणुकीत ईव्हीएम मशिन हॅक करून पाडण्याची धमकी देणा-या परप्रांतीय पोलीसांनी बेड्या ठोकल्या. या निवडणुकीत विजय मिळवून देण्याची ग्वाही देत संशयिताने ४२ लाखाची खंडणी मागितली होती. मात्र त्यास पैसे देण्यास नकार देण्यात आल्याने त्याने पराभव करण्याची धमकी देत पोबारा केला होता. शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने अल्पावधीत संशयितास मखमलाबाद शिवारातून हुडकून काढले असून, त्यास मुंबईनाका पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.
भगवानसिंग नारायण चव्हाण (३४ मुळ रा. अजमेर राजस्थान हल्ली विठू माऊली कॉलनी मखमलाबाद म्हसरूळ लिंकरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. राजस्थानस्थित संशयित चव्हाण मार्बलचे काम करण्यासाठी गेल्या दहा पंधरा दिवसापूर्वीच शहरात दाखल झाला असून, अल्पावधीत श्रीमंत होण्याच्या नादात राज्यातील निवडणुकांची संधी साधत त्याने ही क्लृप्ती सुचल्याची कबुली दिली आहे. मंगळवारी (दि.५) दुपारच्या सुमारास मुंबईनाका परिसरातील शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या मध्य नाशिक मतदार संघाचे उमेदवार वसंत गिते यांचे संपर्क कार्यालय गाठले होते. प्रचार कार्यालय प्रमुख आनंद शिरसाठ यांची भेट घेत त्याने निवडणुकीत उमेदवारास निवडून आणण्याची ग्वाही दिली.
ईव्हीएम मशिन हॅक करून पडलेल्या दहा मतदानापैकी तीन ते चार मते आपोआप उमेदवाराच्या खात्यात जमा होतील. एकुणच उमेदवार विजयी होईल अशी खात्री दिली. यावेळी त्याने या कामाच्या मोबदल्यात ४२ लाख रूपये द्यावे लागतील तसेच अॅडव्हॉन्स म्हणून पाच लाख रूपयांची तात्काळ मागणी केली. कार्यालय प्रमुख शिरसाठ यांनी खातरजमा करीत त्यास पैसे देण्यास नकार दिल्याने ही घटना घडली होती. संशयिताने तेथून काढता पाय घेत शिरसाठ यांना पैसे न दिल्यास निवडणुकीचे प्रोग्रामिंग करणारे माझे ओळखीचे असून ईव्हीएम मशिन हॅक करून तुमच्या उमेदवाराचा पराभूत करेन अशी धमकी देत धुम ठोकली होती. याबाबत शिरसाठ यांनी मुंबईनाका पोलीस ठाणे गाठून रितसर तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची दस्तरखुद पोलस आयुक्त संदिप कर्णीक यांनी दखल घेत संशयिताच्या मुसक्या आवळण्याचे आदेश जारी केल्याने पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. हा गुन्हा शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाकडे वर्ग करण्यात आल्याने वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पथके संशयिताच्या शोधार्थ रवाना करण्यात आली होती. मखमलाबाद शिवारात संशयित वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्याने पथकांनी परिसर पिंजून काढत विठू माऊली कॉलनी भागात संशयिताच्या मुसक्या आवळल्या आहेत. अल्पावधीत श्रीमंत होण्याच्या नादात महाराष्ट्रातील निवडणुकांची संधी साधत त्याने हे कृत्य केल्याची कबुली दिली असून अधिक तपास उपनिरीक्षक रविंद्र बागुल करीत आहेत. ही कारवाई उपायुक्त प्रशांत बच्छाव,सहाय्यक आयुक्त संदिप मिटके व वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर,उपनिरीक्षक रविंद्र बागुल हवालदार प्रशांत मरकड,प्रविण वाघमारे,शरद सोनवणे,संदिप भांड,प्रदिप म्हसदे,रोहिदास लिलके,रमेश कोळी,कैलास चव्हाण,योगीराज गायकवाड,विशाल काठे, जगेश्वर बोरसे,व किरण शिरसाठ आदींच्या पथकाने केली.