नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक रोड हद्दीतील जेलरोड पोलीस चौकीत दिनांक ११ सप्टेंबर २०२४ रोजी एका व्यक्तीच्या आकस्मित मृत्यूची नोंद झाली. मात्र सदर व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली की, अघोरीपूजा, जादूटोणा अशा अंधश्रद्धा प्रकारातून सदर व्यक्तीचा बळी दिला , असा संशय महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला असून, या घटनेचा सखोल तपास करावा आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त नाशिक यांना दिले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, एका व्यक्तीचा स्वयंपाक घरातील छताच्या हूकाला लटकलेला मृतदेह व त्याच्या पायाशी काही पूजेचे साहित्य दिसत असल्याचा व्हिडिओ प्रसारमाध्यमातून व्हायरल होत आहे. काही वृत्तपत्रांमधून याबाबतच्या बातम्या प्रसारित झालेल्या आहेत. सदर व्हिडिओचे अवलोकन केले असता अंधश्रद्धेतून, अघोरी पूजा, जादूटोणा करून सदर व्यक्तीचा बळी दिला किंवा काय, असा दाट संशय आहे.म्हणून ह्या घटनेची सखोल चौकशी करून, जे दोषी आढळतील त्यांच्यावर जादूटोणाविरोधी कायदा तसेच अन्य आवश्यक कायद्यान्वये कडक कारवाई करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य सदस्य राजेंद्र फेगडे ,नाशिक रोड शाखेचे कार्याध्यक्ष अरुण घोडेराव , महेंद्र दातरंगे, नाशिक रोड शाखेचे कार्यकर्ते अर्जुन कासार आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.