नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दुचाकीवर ठेवलेला कॅमेरा चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गोल्फ क्लब भागात घडली. या घटनेत सुमारे ५० हजाराचा कॅमेरा भामट्यांनी लांबविला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पार्थ किशोर जोशी (रा.साने गुरूजीनगर,जेलरोड) या छायाचित्रकाराने याबाबत फिर्याद दिली आहे. जोशी गुरूवारी (दि.५) एटीएल कंपनीच्या लगेच बॅगच्या जाहिरातीसाठी गोल्फ क्बल भागात आले होते. सोनी कंपनीच्या कॅमे-यात शुटींग करून त्यांनी अल्पवधीसाठी पार्क केलेल्या आपल्या दुचाकीवर कॅमेरा ठेवला असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी सुमारे ५० हजार रूपये किमतीचा कॅमेरा हातोहात लांबविला असून अधिक तपास हवालदार म्हैसधुणे करीत आहेत.
कंपनीच्या वेअर ऑफिसमधून चोरी
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– कंपनीच्या वेअर ऑफिसमधून चोरट्यांनी सर्व्हेीसेस वायर व स्क्रॅप बॅट-या चोरून नेल्या. ही घटना सिडकोतील स्टेट बँक चौक परिसरात घडली. या घटनेत सुमारे सतरा हजाराचा ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष नवनाथ धाकतोडे (रा.एचएएल कॉलनी,स्टेट बँक चौक सिडको) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. स्टेट बँक चौकातील एचएएल कॉलनीतील एका बंगल्यात ही घटना घडली. इंडस टावर या पुणे स्थित कंपनीची साई इलेक्ट्रीकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक या शाखेचे या ठिकाणी ऑफिस तथा वेअर हाऊस आहे.या आॅफिसची स्लाईडींग खिडकी उघडून चोरट्यांनी गेल्या २३ ऑगष्ट रोजी ही चोरी केली. या बँगल्यात ठेवलेल्या अॅमरॉन कंपनीच्या स्क्रॅप बॅटºया असा सुमारे १७ हजाराचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक घुनावत करीत आहेत.
चाकू बाळगणा-या दोघांना पोलीसानी ठोकल्या बेड्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बिडी कामगारनगर भागात चाकू बाळगणा-या दोघांना पोलीसानी बेड्या ठोकल्या. संशयितांच्या अंगझडतीत मिळालेला धारदार चाकू हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोशन सुधाकर कटारे (२२ रा.बिडीकामगारनगर,अमृतधाम) व साई सुधीर पाटील (२१ रा.रेशिमबंध लॉन्स मागे,हिरवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. गंगोत्री विहार गार्डन भागात असलेल्या दोघांकडे धारदार चाकू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने धाव घेत दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे धारदार चाकू मिळून आला. याबाबत अंमलदार दिनेश गुंबाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार सुरंजे करीत आहेत.
……..