नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ढिकलेनगर कॉर्नर भागात रिक्षाची काच का फोडली असा जाब विचारल्याने संतप्त एकाने तरूणावर धारदार चॉपरने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत दंडावर व पाठीवार वार करण्यात आल्याने युवक गंभीर जखमी झाला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल कासार असे संशयित हल्लेखोराचे नाव आहे.
याबाबत अमोल मोहन ससाणे (३३ रा.नागचौक,जोशीवाडा) या युवकाने फिर्याद दिली आहे. ससाणे बुधवारी (दि.४) रात्री परिसरातील मेडिकल स्टोअर्समध्ये औषधे खरेदी करण्यासाठी जात असतांना ही घटना घडली. ढिकले नगर कॉर्नर रोडवर त्यास संशयित भेटल्याने त्याने माझ्या मामाच्या रिक्षाची काच का फोडली ? असा जाब विचारला असता संशयिताने तुला काय करायचे मी माझे बघून घेईन असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली.
यावेळी संतप्त कासार याने कमरेला लावलेला चॉपर काढून ससाणे याच्यावर हल्ला केला. या हल्यात हाताच्या दंडावर आणि पाठीवर चॉपरने वार करण्यात आल्याने ससाणे जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.
……….
बसप्रवासात महिलेच्या पर्समध्ये ठेवलेल्या दागिण्यांवर डल्ला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बसप्रवासात भामट्यानी महिलेच्या पर्समध्ये ठेवलेल्या दागिण्यांवर डल्ला मारला. या घटनेत सुमारे अडिच लाख रूपये किमतीची सोन्याची पोत लांबविण्यात आली असून हा प्रकार नांदूरनाका ते लाखलगाव दरम्यानच्या बसप्रवासात घडला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतू शिवाजी शिरसाठ (रा.शाहूनगर,मोटवाणीरोड ना.रोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शिरसाठ यांच्या पत्नी गेल्या २२ आॅगष्ट रोजी सायंकाळी लाखलगाव येथे जाण्यासाठी बसमधून प्रवास करीत असतांना ही घटना घडली. नांदूरनाका येथून त्या बसमध्ये बसल्या होत्या. धावत्या बसमध्ये अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समधील ठेवलेली सुमारे अडीच लाख रूपये किमतीची सोन्याची पोत हातोहात लांबविली. अधिक तपास हवालदार देसाई करीत आहेत.