नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आडगाव नाका भागात उच्चभ्रू वस्तीत राजरोसपणे मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेला कुंटणखाना पोलीसांनी उध्वस्त केला. या कारवाईत दोन मुलींची सुटका करण्यात आली असून, याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात एका महिलेसह तरूणाविरोधात पिटाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या आठ महिन्यांपासून या ठिकाणी देहव्यापाराचा धंदा सुरू होता.
या कारवाईबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरात मसाज सेंटरच्या नावाखाली देहव्यापार होत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचा अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष कामाला लागला होता. पथकाचे हवालदार शेरखान पठाण व गणेश वाघ यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केली. मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखील बुधवारी (दि.४) छत्रपती संभाजीनगर रोडवरील कपालेश्वर नगर भागात पथकाने छापा टाकला असता मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखान्याचा भांडाफोड झाला. निर्माण नक्षत्र या बिल्डींगमध्ये सुरू असलेल्या मसाजसेंटर मध्ये बनावट ग्राहक पाठवून पोलीसांनी खात्री केली असता या ठिकाणी दोन मुलींच्या माध्यमातून देहविक्री सुरू होती.
जाफर मन्सुरी नामक इसमाने या कुंटणखान्यास मुली पुरविल्याचे तपासात समोर आले असून पीडित मुलींची सुटका करीत पोलीसांनी याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके, पोलीस उपनिरीक्षक पंडीत अहिरे, महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली भाबड, सहायक पोलीस उपनिरीक्षक नामदेव सोनवणे, पोलीस हवालदार शेरखान पठाण, पोलीस हवालदार गणेश वाघ, पोलीस हवालदार समीर चंद्रमोरे, पोलीस अंमलदार प्रजीत ठाकुर, महिला पोलीस नाईक मनिषा जाधव, महिला पोलीस शिपाए वैशाली घरटे, लता सुरसाळवे, स्नेहल सोनवणे, चालक सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय रायते आदींच्या पथकाने केली.