नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात तोतया पोलीस पुन्हा एकदा सक्रीय झाले असून, पोलीस असल्याची बतावणी करीत भामट्यांनी वेगवेगळया भागातून जाणा-या दोघांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत महिलेसह वृध्दास गाठून भामट्यांनी सोन्याचे अलंकार व घड्याळ पळविले असून याप्रकरणी पंचवटी व इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार हिरावाडीतील भारती लहेरीभाई सोलंकी (५० रा.गुंजाळबाबानगर) या बुधवारी परिसरातील मंदिरात देवपुजा करण्यासाठी जात असतांना ही घटना घडली. गोविंदानंग अपार्टमेंट भागात दोघांनी त्यांना गाठून आम्ही पोलीस असून पुढे चोरी झाली असल्याचे सांगितले. यावेळी भामट्यांनी अगावरील दागिणे काढून ठेवण्याचा सल्ला देत मदतीच्या बहाण्याने सोलंकी यांच्या गळयातील सोनसाखळी व सोन्याच्या बांगड्या असे सुमारे ८० हजाराचे अलंकार हातोहात लांबवत दुचाकीवर पोबारा केला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक कैलास जाधव करीत आहेत.
दुसरी घटना राजीवनगर भागात घडली. सुभाष केशवराव कर्तिकर (७७ रा.श्रीरामचौक,राजीवनगर) यांनी फिर्याद दिली आहे. कर्तिकर गेल्या शनिवारी (दि.३१) दुपारी परिसरात फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले होते. पंजाब नॅशनल बँकेजवळून ते पायी जात असतांना दोघा भामट्यांनी त्यांना गाठले. पोलीस असल्याची बतावणी करीत संशयितांनी कर्तिकर यांच्या हातातील अंगठी व घड्याळ काठून ठेवण्याचा सल्ला देत सुमारे २१ हजाराचा ऐवज लांबविला. याबाबत इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.