नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– काळाराम मंदिर परिसरात पुतणीस पळवून लावण्यात कारणीभूत असल्याच्या संशयातून तिघांनी रिक्षाचालकावर चॉपरने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत रिक्षाचालकाच्या डोक्यावर वार करण्यात आल्याने तो जखमी झाला असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार खंडू बोडके,ओमकार बोडके व नवनाथ बोडके (रा.सर्व वाघाडी तालीमच्या पाठीमागे पंचवटी) अशी हल्ला करणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत अजय ज्ञानेश्वर खेमनार (२६ रा.गोपाळनगर,अमृतधाम) या रिक्षाचालकाने फिर्याद दिली आहे. खेमनात सोमवारी (दि.२) दुपारी पाण्याची बाटली घेण्यासाठी काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजा भागातील साई किराणा दुकानात गेला असता ही घटना घडली.
निरमान उपवन बिल्डींगसमोर संशयित खेमनार याचा मित्र वैभव कांबळे याच्याशी वाद घालत होते. यावेळी खेमनार तेथे गेले असता संशयितांनी आमची पुतणी पळून जाण्यास तू कारणीभूत आहेस असे म्हणत खेमनार याच्यावर हल्ला केला. संतप्त त्रिकुटाने शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली तर एकाने त्यांच्या डोक्यावर धारदार चॉपरने वार केला. या घटनेत खेमनार जखमी झाले असून अधिक तपास हवालदार वाडेकर करीत आहेत.