नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ओमकार पार्क भागात पूर्ववैमनस्यातून तीन जणांच्या टोळक्याने युवकावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत २१ वर्षीय तरूण जखमी झाला असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रथमेश उर्फ गट्या गायकवाड (रा.पोकार कॉलनी), यश दहिवाल (रा.ओमकार पार्क जवळ,दिंडोरीरोड) व अथर्व नामक युवक असे तरूणावर हल्ला करणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत ओम राजकुमार मोराडे (२१ रा.रिलायन्स पेट्रोलपंपासमोर,कलानगर) या युवकाने फिर्याद दिली आहे. मोराडे शनिवारी (दि.३१) रात्री परिसरातील ओमकार पार्क भागात गेला असता ही घटना घडली.
अंबेश्वरी शॉप समोर उभ्या असलेल्या त्रिकुटाने त्यास जवळ बोलावून घेत त्याच्यावर हल्ला केला. संशयित अथर्व नामक युवकाने गेल्या वर्षी तू भांडण केले होते अशी कुरापत काढून टोळक्याने त्यास लाथाबुंक्यांनी मारहाण केली. यावेळी एकाने त्याच्या डोक्यावर व हातावर कोयत्याने वार करून जखमी केले. अधिक तपास हवालदार गवारे करीत आहेत.