नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- देवळाली गावातील किराणा दुकान फोडून चोरट्यांनी गल्यातील रोकडसह तांदळाच्या कट्यावर डल्ला मारला. या घटनेत सुमारे दोन हजाराचा ऐवज चोरट्यांनी पळविला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय प्रकाश शिंदे (रा. आशापूरा अपार्टमेंट, देवळाली गाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शिंदे यांचे देवळाली गावातील कुस्ती मैदानाजवळ किराणा दुकान आहे. गुरुवारी (दि. २९) मध्यरात्री अज्ञात चोरटयाने दुकानाचे कुलूप तोडून ही घरफोडी केली. दुकानात शिरलेल्या चोरट्यांनी गल्यातील सुमारे पंधराशे रूपये व २० किलो वजनाचा तांदळाचा कट्टा असा सुमारे दोन हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार लखन करीत आहेत.
२३ वर्षीय तरूणाची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- औद्योगीक वसाहतीतील चुंचाळे शिवारात राहणा-या २३ वर्षीय तरूणाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रवी ज्ञानेश्वर शिखरे (रा. दत्तनगर, चुंचाळे शिवार, अंबड) असे मयत युवकाचे नाव आहे. रवी शिखरे या युवकाने शुक्रवारी (दि. ३०) सायंकाळी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरुममध्ये पंख्याच्या हुकास साडी बांधून गळफास लावून घेतला होता.
ही बाब निदर्शनास येताच वडील ज्ञानेश्वर शिखरे यांनी त्यात तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैदयकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत.









