नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गणेश मुर्ती विक्री स्टॉलवर उभ्या असलेल्या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले. ही घटना हिरावाडीतील त्रिमुर्ती नगर भागात घडली. या घटनेत ६० हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र चोरट्यांनी लांबविले असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कीर्ती प्रशांत भंगाळे (रा. गोपाळनगर, अमृतधाम) पंचवटी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. भंगाळे शुक्रवारी (दि.३०) सायंकाळी हिरावाडीतील त्रिमुर्तीनगर भागात गणपती मुर्ती बुकिंग करण्यासाठी गेल्या होत्या.
सुहाग साडी दुकानासमोरील गणेश मूर्ती स्टॉल येथे त्या गणेश मूर्तीची पाहणी करीत असतांना ही घटना घडली. बाप्पा सिताराम मार्गाने येणाºया दुचाकीस्वारांनी स्टॉलजवळ आपले वाहन थांबवून भंगाळे यांच्या गळयातील सुमारे ६० हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र हिसकावून पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक प्रकाश नेमाणे करीत आहेत.