नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- धारदार शस्त्राने हल्ला करीत टोळक्याने तरूणास लुटल्याची घटना उत्तरानगर भागात घडली. या घटनेत जखमी तरूणाच्या खिश्यातील दोन हजाराची रोकड बळजबरीने काढून घेत भामट्यांनी पोबारा केला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश लिलके व त्याचे तीन साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित लुटारूंची नावे आहेत. याबाबत दुर्गेश प्रकाश पगारे (२७ रा.आंबेडकरवाडी सिध्दार्थ हॉटेलसमोर नाशिक पुणारोड) या युवकाने फिर्याद दिली आहे. पगारे गुरूवारी (दि.२९) रात्री कामावरून घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. उत्तरानगर येथील सुयोग नगरच्या दिशेने जाणा-या रोडने तो पायी जात असतांना परिचीत लिलके व त्याच्या तीन साथीदारांनी पगारेची वाट अडविली.
यावेळी टोळक्याने कुठलेही कारण नसतांना शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यातील एकाने डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने पगारे जखमी झाला असता संशयितानी बळजबरीने खिशातील दोन हजार रूपयांची रोकड काढून घेत पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक पावरा करीत आहेत.