नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपूर गावातील खोका मार्केट भागात दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने कारची तोडफोड करीत मामा भाच्यावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत मामा भाचे जखमी झाले असून, याप्रकरणी अकरा जणांविरूध्द गैरकायद्याची मंडळी जमविल्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या मााहितीनुसार बादल,खंग्या उर्फ आदित्य जाधव,सागर वाघमारे,रोशन जाधव,दिदया जाधव,अजय,मुकेश प्रजापती,अमोल सोमासे,ज्ञानेश्वर वाघमारे,आकाश वाघमारे व टकल्या नामक युवक अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत संदिप मधुकर पवार (३० रा.खोका मार्केट समोर,सातपूर गाव) या युवकाने फिर्याद दिली आहे. संदिप पवार मंगळवारी (दि.२७) रात्री जेवन आटोपून घरासमोर शतपावली करीत असतांना ही घटना घडली. परिचीत असलेल्या बादल, सागर वाघमारे व रोशन जाधव यांनी त्यास आवाज देवून बोलावून घेतले. यावेळी संशयितांनी विडीकाडीसह दारू पैश्यांची मागणी केल्याने संदिप पवार याने पैसे देण्यास नकार दिल्याने हा हल्ला करण्यात आला.
संतप्त टोळक्याने पवार यास शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी पवारच्या बहिणीसह शुभम संजय बोराडे (२३) हा त्याच्या मदतीला धावून आला असता संशयिताने बहिणीस विटकर फेकून मारत तर दोघा मामा भाच्यावर कोयत्याने हल्ला करीत जखमी केले. याप्रसंगी टोळक्याने जीवे मारण्याची धमकी देत घरासमोर पार्क केलेल्या कार एमएच ०२ सीडब्ल्यू ८८६० हिची तोडफोड करीत नुकसान करीत दहशत माजविली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पठाण करीत आहेत.