नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेगवेगळया भागात पार्क केलेल्या स्कार्पिओ, होंडा सिटी कारसह दोन दुचाकी चोरट्यांनी नुकत्याच पळवून नेल्या. याप्रकरणी भद्रकाली,अंबड,आडगाव व नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून वाहनचोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
जुने नाशिक येथील बागवानपुरा भागात राहणा-या कैफ फिरोज कुरेशी यांची होंडा सिटी कार एमएच ०६ एसी ५००० ही गेल्या गुरूवारी (दि.२२) रात्री वडाळानाका येथील जे.के.हाऊस भागात पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत. तर विजय अरूण अहिरराव (रा.साई सदन रो हाऊस,महालक्ष्मीनगर अंबड) यांची स्कार्पिओ एमएच १५ बीएक्स ७५८२ सोमवारी (दि.२६) रात्री त्यांच्या घरासमोर लावलेली असतांना ती अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार टोपले करीत आहेत.
मोटारसायकल चोरीची पहिली घटना तपोवनात घडली. रविकुमार राजकुमार शर्मा (रा.सुंदरबन अपा. उपनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शर्मा गेल्या शनिवारी (दि.१७) तपोवनात गेले होते. अमरधामरोडवरील स्वामी नारायण मंदिर परिसरात त्यांनी आपली स्प्लेंडर एमएच ८५ बीवाय २५८४ पार्क केली असता ती चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत. तर मनिष रामचंद्र वाकोडे (रा.स्वप्नपुर्ती सोसा.आडगाव) हे गेल्या रविवारी (दि.११) रेल्वेने बाहेरगावी गेले होते. नाशिकरोड रेल्वेस्थानकातील राजन इंटरप्रायझेसच्या माध्यमातून चालविण्यात येणा-या सेन्ट्रल रेल्वे पे अॅण्ड पार्क मध्ये लावलेली त्यांची एमएच १५ सीएन ६५५९ चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात राजन इंटरप्रायझेसचे संतोष पवार व त्यांच्या दोन कामगारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.