नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लग्नाच्या मागणीस वैतागलेल्या पंधरा वर्षीय मुलीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तरूणासह त्याच्या कुटूंबातील सदस्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कलाम इजहार मन्सुरी, त्याची आई नाना खाला, जहांगीर शेख, बबलू शेख, मुन्ना शेख, लादेन मन्सुरी, समीर बबलू शेख, नद्दा मन्सुरी शेख, अंजूम सय्यद, साहिल सय्यद (रा. देवळालीगाव परिसर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पंधरा वर्षीय पिडीता शहरातील महाविद्यालयात ११ वीचे शिक्षण घेत होती.
संशयित कलाम मन्सुरी हा गेल्या दोन वर्षा पासून पाठलाग करीत लग्नाची मागणी घालत होता. त्यास कुटूंबियाचा पाठिंबा असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संशयित कुटूंबियांच्या त्रासास कंटाळून मुलीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलीसांनी तात्काळ संशयित तरुण, त्याची आई, भाऊ आणि इतर नातेवाइकांच्या विरोधात गु्हा दाखल केला असून त्यांना लवकरच अटक केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. अधिक तपास उपिरीक्षक माळी करीत आहेत.