नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- किरकोळ कारणातून गॅस पाईप फिटींग करणा-या टोळक्याने मायलेकांना बेदम मारहाण केल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील महालक्ष्मीनगर भागात घडली. या घटनेत तरूणासह त्याची आई जखमी झाली असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात ठेकेदारासह त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यश नानकर व त्याचे तीन मजूर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सशयितांची नावे असून नानकर हा एमएनजीएल कंपनीचा ठेकेदार आहे. याबाबत प्रतिक लक्ष्मण इंगळे (१८ रा.सर्वज्ञ पार्क अपा.महालक्ष्मीनगर) या युवकाने फिर्याद दिली आहे. एमएनजीएल कंपनीच्या वतीने शहरातील विविध भागात गॅस पाईप लाईनचे काम सुरू आहे. संशयित ठेकेदार नानकर याच्या मार्फत सध्या सर्वज्ञ पार्क अपार्टमेंट शेजारील इमारतीस गॅस पाईप फिटींगचे काम सुरू असून रात्री उशीरापर्यंत हे काम सुरू राहत असल्याने ड्रील मशिनच्या आवाजाने रहिवाश्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मुलीचा पेपर सुरू असल्याने इंगळे यांच्या आई या संध्याकाळच्या सुमारास ड्रील मशिनचा खूप आवाज येतो असे सांगण्यास गेल्या असता ही घटना घडली. संशयित ठेकेदारासह त्याच्या तीन मजूरांनी इंगळे यांच्या आईस शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी प्रतिक इंगळे हा आपल्या आईच्या मदतीस धावून गेला असता संशयितांपैकी एकाने दोघा मायलेकांना गॅसच्या लोखंडी पाईपाने मारहाण केली. अधिक तपास उपनिरीक्षक पाडवी करीत आहेत.