नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भाडेतत्वावर लावून देण्याचे आमिष दाखवत भामट्यांनी होंडा सिटी कारचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. कारची परस्पर विल्हेवाट लावल्याने कार मालक असलेल्या टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स व्यावसायीकाने पोलीसात धाव घेतली असून, याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रमोद मारूती पाटील (३२ रा.शिवदर्शन हाऊसिंग सोसा.धन्वंतरी कॉलेज मागे कामटवाडा) व हेमंत उर्फ गणेश पुरूषोत्तम गोसावी (३५ रा.सहजीवनगर गणेशवाडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत सुनिल उखा निकम (रा.राधाकृष्णनगर,अशोकनगर) यांनी फिर्याद दिली आहे. निकम यांचा टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असून अशोकनगर येथे श्री स्वामी समर्थ टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स नावाचे कार्यालय आहे. या ठिकाणी संशयितांचे येणे जाणे होते. बाहेरगावी जाण्यासाठी निकम यांच्या मार्फत ते वाहन व्यवस्था करीत असल्याने एकमेकांमध्ये विश्वास निर्माण झाला होता. यातून त्यांनी गेल्या मे महिन्यात होंडा सिटी कारला (एमएच ०१ एसी १९७६) नियमीत भाडेतत्वावर लावून देण्याचे आमिष दाखविले.
दरमहा चांगले उत्पन्न मिळणार असल्याने निकम यांनीही संमती दर्शविल्याने या व्यवहारात दरमहाची रक्कम ठरविण्यात येवून वाहन संशयितांच्या स्वाधिन करण्यात आले होते. मात्र तीन महिने उलटूनही संशयितांनी भाडेतत्वाची रक्कम अथवा वाहन आणून न दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून संशयितांनी कारची परस्पर विल्हेवाट लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अधिक तपास उपनिरीक्षक राहूल नळकांडे करीत आहेत.