नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जमिन खरेदी विक्रीत शहरातील एकास दोघांनी तब्बल अडिच कोटींना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. जमिनीच्या व्यवहारात साठेखत करूनही मुदत संपण्यापूर्वी सदरची जमिन परस्पर दुस-यास विक्री करण्यात आल्याने ही फसवणुक झाली असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश पांडूरंग पासळकर (रा.केतन अपा.बिगवेवाडी रोड, पुणे) व अविनाश वामन थोरात (रा.ब्ल्यू हेवन,गुरूजी रूग्णालयाजवळ आनंदवली) अशी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत संजय वामनराव बोडके (रा.सत्या कॉलनी,त्र्यंबकरोड) यांनी फिर्याद दिली आहे.
बोडके यांनी २०२१ मध्ये संशयितांशी पुणे जिह्यातील भावेखल ता.भोर येथील सर्व्हे नं. ६६ मधील क्षेत्र २.०४४८ हेक्टर जमिनीचा व्यवहार केला होता. या व्यवहारापोटी २१ जुलै २०२१ ते सप्टेंबर २०२३ दरम्यान सुमारे २ कोटी ४४ लाख ३५ हजाराची रक्कमही स्विकारण्यात आली होती. याबाबत साठेखतही तयार करण्यात आले होते. मात्र हा व्यवहार पूर्ण करण्यास अवधी असतांना संशयितांनी मुदतीपूर्वीच जमिनीचा दुस-याशी व्यवहार करून सदरची मिळकत विक्री केली. अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक रूपेश केदार करीत आहेत.