नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात मुला मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून वेगवेगळया भागात राहणारी तीन अल्पवयीन मुले नुकतेच बेपत्ता झाली आहेत. त्यात दोन मुलासह एका मुलींचा समावेश असून, तिघांचे कुणी तरी अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत पंचवटी,अंबड व नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पेठरोड भागातील अल्पवयीन मुलगा बुधवारी (दि.२१) पासून बेपत्ता आहे. सकाळच्या सुमारास घराबाहेर पडलेला मुलगा अद्याप घरी परतला नसून त्याचे कुणी तरी अपहरण केल्याचा संशय कुटुंबियांनी वर्तविला आहे. याबाबत मामाने दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.
दुसरा मुलगा सिडको भागातून बेपत्ता झाला. माऊली लॉन्स परिसरात राहणारा मुलगा बाहेरून जावून येतो असे सांगून घराबाहेर पडला तो अद्याप परतला नाही. त्याला कोणीतरी फुस लावून पळवून नेल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून याप्रकरणी पालकांनी पोलीसात धाव घेतल्याने अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार टोपले करीत आहेत.
तिसरा प्रकार नाशिकरोड भागात घडला. मावशीच्या घरून टिव्हीचा रिमोट घेवून येते असे सांगून घराबाहेर पडलेली अल्पवयीन मुलगी अद्याप घरी परतली नाही. शुक्रवारी (दि.२३) दुपारच्या सुमारास ती घराबाहेर पडली होती. सर्वत्र शोध घेवूनही ती मिळून न आल्याने तिला कुणी तरी पळवून नेल्याचा संशय कुटूंबियांनी व्यक्त केला असून याप्रकरणी भावाने दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक काळे करीत आहेत.