नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रासबिहारी मेरी लिंकरोडवरील चक्रधरनगर भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे पावणे चार लाख रूपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात तीन हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्याचा समावेश आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुवर्णा जितेंद्र कवडे (रा.साईसृष्टी अपा.चक्रधरनगर) यानी याबाबत फिर्याद दिली आहे. कवडे कुटुंबिय गुरूवारी (दि.२२) कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कडी कोयंड्याचे स्क्रु खोलून ही चोरी केली.
घरात शिरलेल्या भामट्यांनी बेडरूममधील लाकडी कपाटातून रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ३ लाख ७४ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.