नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या रॅलीचा मंगळवारी (दि.१३) शहरात समारोप झाला. तपोवनातून निघालेल्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने समाजबांधवांची गर्दी उसळली होती. या गर्दीची संधी साधत चोरट्यांनीही हात की सफाई केली. या गर्दीत सोन्याचांदीच्या दागिण्यांसह मोबाईल आणि पाकिटे चोरट्यांनी लांबविले असून पंचवटीत चौघांच्या गळय़ातील सुमारे पाच लाखाच्या दागिणे भामट्यांनी हातोहात लांबविले. याबाबत पंचवटी आणि आडगाव पोलीस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार केशव पंढरीनाथ ढोली (रा.वावरेनगर,कामटवाडे) यानी पहिली फिर्याद दिली आहे. ढोली या रॅलीत सहभागी झाले होते. काट्यामारूती सिग्नल चौकात उभे असतांना चोरट्यांनी त्यांच्या गळयातील सोनसाखळी लांबविली. तर मालेगाव स्टॅण्ड भागात सौरभ देवचंद महाले यांच्या गळ््यातील चैन तर सिमा माधव पिंगळे या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र असा सुमारे दीड लाखाचे अलंकार भामट्यांनी हातोहात लांबविले. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात एकत्रीत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत.
दुसरी घटना छत्रपती संभाजी रोडवरील जनार्दन स्वामी मठ भागात घडली. या ठिकाणी अनेकांच्या दागिण्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. याबाबत ज्ञानेश्वर कारभारी शिंदे (रा.वनसगाव ता.निफाड ) यांनी फिर्याद दिली आहे. शिंदे यांच्यासह अन्य तक्रारदारांच्या गळयातील सुमारे ३ लाख ५४ हजार रूपये किमतीचे अलंकार भामट्यांनी लांबविले. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार कहांडळ करीत आहेत.