नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात घरफोड्या वाढल्या असून वेगवेगळया भागातील तीन घरे फोडून चोरट्यांनी सुमारे सव्वा पाच लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात एका भरदिवसा झालेल्या घरफोडीचा समावेश असून याप्रकरणी आडगाव,गंगापूर व अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली तक्रार विनोद जगन्नाथ पवार (रा.स्वामी समर्थ बंगला,सरस्वतीनगर धात्रकफाटा) यांनी दिली आहे. पवार कुटूंबिय गेल्या शनिवारी (दि.१०) अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २९ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी आडगव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.
दुसरी घटना औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात घडली. भाऊराव हरी घाटे (रा.लकी स्वप्नपुर्ती रो हाऊस अमृतगार्डन जवळ, भवर टॉवर मागे शिवाजीनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. घाटे कुटूंबिय मंगळवारी (दि.२०) बाहेरगावी गेले असता ही चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून लोखंडी कपाटातील ट्रॅव्हलींग बॅगमध्ये ठेवलेली रोकड व ४५ हजाराची रोकड असा सुमारे ४ लाख ८३ हजार ९०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गेंगजे करीत आहेत.
तिसरी घटना सिडकोतील गणेश चौकात घडली. सुवर्णा रविंद्र दाभाडे (रा.अश्विननगर,सिडको) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. दाभाडे यांचे गणेश चौकातील अतुल डेअरी शेजारी बालाजी मॅचिंग सेंटर नावाचे दुकान आहे. सोमवारी (दि.१९) रात्री अज्ञात चोरट्यांनी बंद दुकानाचे शटरचे कुलूप तोडून गल्यातील सुमारे २३ हजाराची रोकड चोरून नेली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.