नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नंबरप्लेट बदलून चोरट्याकडून दुचाकीचा राजरोसपणे वापर होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. गुन्हेगारांच्या शोध मोहिमेत चोरटा मोटारसायकल चोरी शोध पथकाच्या हाती लागला असून वाहनाच्या इंजिन आणि चेसीज नंबरच्या पडताळणीत तो पोलीसांच्या गळाला लागला आहे. संशयिताच्या अटकेने म्हसरूळ पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा उघडकीस आला आहे.
समिर उर्फ बबलू सलीम पिंजारी (२७ रा. वेदांत सी विंग चाणक्यपुरी म्हसरूळ ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. शहरातील वाढती वाहनचोरी रोखण्यासाठी शहर पोलीसांच्या गुन्हे शाखेच्या वतीने मोटार सायकल चोरी शोध पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकाच्या वतीने पोलीस रेकॉर्ड वरील गुन्हेगारांची तपासणी केली जात असून त्यांच्या ताब्यातील वाहनांची पडताळणी केली जात आहे.
यापार्श्वभूमिवर पथक मंगळवारी (दि.२०) पडताळणी मोहिम राबवित असतांना अंमलदार गणेश वडजे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. रेकॉर्डवरील संशयित पेठरोडवरील पवार लॉन्स भागात येणार असल्याच्या माहितीवरून सापळा लावण्यात आला होता. सिध्दीविनायक चौकात दुचाकीवर आलेल्या भामट्याची वाट अडवित पथकाने तपासणी केली असता तो बनावट नंबरप्लेट लावून राजरोसपणे चोरीची मोटार सायकल वापरत असल्याचे पुढे आले. इंजिन व चेसीज तपासणीत एमएच १५ जीजे ०५२३ असा खरा नंबर असल्याची माहिती अभिलेख पडताळीत समोर आल्याने पथकाने त्याची कसुन चौकशी केली असता गेल्या वर्षी नवरात्रोत्सवात त्याने पेठरोड येथील जगदंबा फ्रेण्ड सर्कलने भरविलेल्या दांडिया स्थळावरून चोरी केल्याची कबुली दिली.
याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने संशयितास मुद्देमालासह म्हसरूळ पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड,पोलीस नाईक योगेश चव्हाण,रविंद्र दिघे,दत्तात्रेय चकोर,मगेश जगझाप अंमलदार भगवान जाधव,गणेश वडजे,मंगला जाधव व सविता कदम आदींच्या पथकाने केली.