नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भाडेतत्वावर घर मिळवून देण्याचे आमिष दाखवून ब्रोकरने काश्मिरी तरूणास तेवीस हजार रूपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरात शिक्षण घेणा-या तरूणास वर्ष उलटूनही भाडेतत्वावरील घर मिळवून न देता पोबारा केल्याने युवकाने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दांम्पत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संदिप पवार व माधुरी पवार (रा.दोघे सिध्दी सोसा.कामटवाडे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत उधित विजयकुमार डोग्रा (२१ रा.जम्मू काश्मिर) या युवकाने फिर्याद दिली आहे डोग्रा शहरातील नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत असून सध्या तो एका बॉईज होस्टेलमध्ये वास्तव्यास आहे. गोविंदनगर भागात त्यास गेल्या वर्षी फ्लॅट भाडेतत्वावर पाहिजे होता. त्यामुळे त्याने संशयिताशी संपर्क साधला असता ही फसवणुक झाली. संशयिताने २० ऑगष्ट २०२३ रोजी तरूणाची भेट घेत गोविंद नगर येथे फ्लॅट मिळवून देण्याच्या ग्वाही दिली.
यावेळी त्याने डिपॉजीटपोटी पैश्यांची मागणी केल्याने डोग्रा यांनी संशयिताच्या पत्नीच्या नावे असलेल्या बॅक खात्यात गुगल पे द्वारे २३ हजार रूपये ऑनलाईन पाठविले होते. वेळोवेळी पाठपुरावा करूनही संशयिताने डोग्रा यांना घर उपलब्ध करून दिले नाही तसेच वर्ष उलटूनही पैसे परत केले नाही. फोनवरील संपर्क तुटल्याने डोग्रा यानी चौकशी केली असता संशयित दांम्पत्याने गाशा गुंडाळल्याचे समोर आले असून अधिक तपास उपनिरीक्षक उंडे करीत आहेत.