नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बाहेरगावाहून शिक्षणासाठी शहरात येणा-या महाविद्यालयीन तरूणींचा बुलेटवर पाठलाग करीत विनयभंग करणा-या दोघांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई रासबिहारी लिंकरोड भागात करण्यात आली. तरूणीने वेळीच संपर्क साधल्याने भामटे पोलीसांच्या जाळयात अडकले असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयुर संजय नागरे (रा.जाखोरी ता.निफाड) व अमोल सुदाम घुगे (रा.कोटमगाव ता.जि.नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. निफाड तालूक्यातील १८ वर्षीय पीडितेने याबाबत फिर्याद दिली आहे. पीडिता व तिची मैत्रीण बुधवारी (दि.२१) दुपारी रासबिहारी लिंक रोड भागातून रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली.
बुलेटवर पाठलाग करीत आलेल्या संशयितांनी दोघा मैत्रीणींची वाट अडवित विनयभंग केला. संशयिताकडून वेळोवेळी पाठलाग होत असल्याने एकीने तात्काळ पोलीसांशी संपर्क साधल्याने दोघे भामटे पोलीसांच्या जाळ्यात अडकले असून अधिक तपास उपनिरीक्षक प्रकाश नेमाणे करीत आहेत.