नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिकरोड रेल्वेस्थानक भागात गुंडा विरोधी पथकाने वृध्दास लुटणा-या दोघांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांना उपनगर पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. मौजमजा मारण्यासाठी हमाली काम करणा-या दोघांनी वृध्दास लुटल्याचे समोर आले आहे. लिफ्टचा बहाण्याने निर्जनस्थळी घेवून जात भामट्यांनी मारहाण करीत वृध्दाच्या हातातील सोन्याची अंगठी मोबाईल व दुचाकी लांबविली होती.
अनिल गौतम इंगळे (२२ मुळ रा.सिल्लोड जि.संभीजीनगर हल्ली भाजीपाला मार्केट यार्ड ) व अभिषेक सुनिल चौघुले (२४ रा.अवधुतवाडी दिंडोरीरोड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. गुंडा विरोधी पथकाचे अंमलदार राजेश राठोड यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांच्या बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. जेलरोड येथील अॅन्थेनी गॅब्रिअल साळवे (६५ रा. जेलरोड) हे शुक्रवारी (दि.१६) नाशिकरोड येथील सेंट अण्णा चर्च येथे गेले होते. रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास ते घराकडे परतण्यासाठी चर्च बाहेर पडले असता ही घटना घडली होती. अॅक्टीव्हा (एमएच १५ ईएम ६३३१) दुचाकीवर ते घराकडे निघाले असता चर्च बाहेर उभ्या असलेल्या एका तरूणाने त्यांच्याकडे लिफ्ट मागून ही लुटमार केली होती.
क्रोमा शोरूम भागातील मोकळया मैदानावर अन्य साथीदाराच्या मदतीने साळवे यांना मारहाण करीत सुमारे ५३ हजार रूपये किमतीचा वरिल मुद्देमाल भामट्यांनी लांबविला होता. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस लुटारूंचा शोध घेत असतांनाच गुंडा विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. मार्केट यार्डात काम करणारे दोघे संशयित चार – पाच दिवसांपूर्वी लाल रंगाच्या अॅक्टीव्हावर औरंगाबाद येथे गेले असून ते मंगळवारी (दि.२०) रात्री रेल्वेने शहरात दाखल होणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार पंचवटीतील मार्केट यार्ड आणि नाशिकरोड भागात सापळा लावण्यात आला होता.
दोघे संशयित रेल्वेस्थानकातून बाहेर पडताच त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून पोलीस तपासात त्यांनी मौजमजा करण्यासाठी ही लुटमार केल्याची कबुली दिली. लुटमारीतील ऐवज सिल्लोड येथे ठेवण्यात आल्याची माहिती दिल्याने संशयितांना पुढील तपासासाठी उपनगर पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते.मलंग गुंजाळ,विजय सुर्यवंशी,सुनिल आडके,प्रदिप ठाकरे,राजेश राठोड,अक्षय गागुर्डे,गणेश भागवत,प्रविण चव्हाण,अशोक आघाव,निवृत्ती माळी,सुवर्णा गायकवाड आदींच्या पथकाने केली.