नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दिंडोरी रोडवरील मेरी परिसरातील तारवालानगर येथे निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाची हत्येच्या प्रकरणाचा उलगडा अवघ्या पाच तासात लागला आहे. धारधार शस्त्राने गगन प्रवीण कोकाटे (२८) या युवकाचा खून करण्यात आला होता. हा खून एका महिला शिक्षिकाने दोन लाखाची सुपारी देऊन सहा जणांच्या मदतीने केला आहे. त्यात दोन अल्पवयीन मुले आहेत.
या घटनेनंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी पोलिसांना गगन याच्या खिशातून एक चिट्ठी मिळाली होती. दरम्यान ही हत्या प्रथमदर्शनी प्रेम प्रकरणातून झाली असल्याचा संशय पोलिसांना आल्यानंतर त्यांनी खून्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर या खूनाचा उलगडा झाला. या घटनेत पोलिसांनी संकेत शशिकांत रणदिवे, मेहफूज रशिद सैयद, रितेश दिलीप सपकाळे, गौतम सुनील दुसाने यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
नेमकं घडलं काय
या घटनेत सुपारी देणारी महिला भावना सुशांत कदम ही रात्रशाळेत शिक्षिका आहे. तीचे मयत गगन कोकाटे बरोबर २०२० मध्ये प्रेमसंबध जुळले होते. पण, त्यानंतर गगन सतत त्रास देत असल्यामुळे तीने संबध तोडले होते. पण, त्यानंतर गगन त्रास देऊ लागला. त्यानंतर भावना कदमच्या मुलीलाही त्रास दिला. त्यामुळे भावना कदमने या त्रासामुळे आपल्या ओळखीच्या संकेत रणदिवेला काटा काढण्यासाठी दोन लाखाची सुपारी दिली. त्यासाठी १ लाख अँडव्हान्सही दिले होते.
असा केला खून
भावना कदमने गगन कोकाटेला दिंडोरी रोडवरील पंजाबराव देशमुख वस्तीगृहाजवळ भेटण्यासाठी बोलावले. याची माहिती त्यांनी अगोदरच संकेत रणदिवेला दिली. त्यानंतर भावना व गगन बोलत असतांना संकेत रणदिवे व त्याचे साथीदार आले व त्यांनी तुम्ही येथे काय करता अशी विचारणा करुन रॅाडने मारहाण केली. त्यानंतर गगन खाली पडल्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला.
मंगळवारी सकाळी कळाली घटना
दिंडोरी रोडवरील पंजाबराव देशमुख वस्तीगृहाबाहेर मंगळवार रात्रीच्या सुमारास अज्ञात संशयितांनी डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून ही हत्या केली. बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास काही नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात गगन याचा मृतदेह आढळून आल्याने त्यांनी पंचवटी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर खून झाल्याचे उघडकीस आले.