नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात एक विचित्र आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास उंटवाडी येथे तीन वाहनांचा एकाचवेळी विचित्र अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मदतकार्य करीत असतानाच पोलिसांना एका वाहनामध्ये एक बॅग दिसली. या बॅगेची तपासणी केली असता त्यात चक्क नोटांची बंडले आढळून आली. या वाहनाचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता. एवढे पैसे कुठून आणले आणि कुठे घेऊन जात होता, असा प्रश्न पोलिसांना पडला. त्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली.
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंवटाडी येथे मध्यरात्री तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातामुळे रस्त्यावर वाहतूक खोळंबा झाला. माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी दाखल झालो. या अपघातात काही जणांना दुखापत झाली आहे. या अपघातप्रकरणी पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यात एका वाहनातील पैशांची बॅग समोर आली. मद्यधुंद अवस्थेतील या चालकामुळेच हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. हा चालक ही पैशांची बॅग कुठे घेऊन जात होता, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बॅगेतील या नोटा खोट्या असल्याचे समोर आले आहे. २०० आणि २००० रुपयांच्या या नोटांची बंडले बनावट आहेत. हे ऐवढे पैसे या चालकाने कुठून आणले, कशासाठी आणले आणि तो ते कुठे घेऊन जात होता, त्याच्यासमवेत अन्य कुणी जण या सर्व प्रकारात सहभागी आहेत का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. अंबड पोलिसांनी त्या चालकास ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणात मोठे रॅकेट उघडकीस येण्याची अपेक्षा पोलिसांना आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी विशेष पथक तयार केले असून त्याद्वारे या सर्व प्रकरणाचा छडा लावला जाणार आहे.
Nashik Crime 3 Vehicle Accident Police Found Fake Notes Bundles