नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लिफ्ट देणे एका दुचाकीस्वारास चांगलेच महागात पडले आहे. दुचाकीवर डबलसिट बसलेल्या भामट्याने चालकाच्या पाठीशी लावलेल्या बॅगेतील रोकडवर डल्ला मारला असून या घटनेत सुमारे २८ हजाराची रोकड लांबविण्यात आली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहूल शिवाजी महाजन (रा.लवटेनगर,जयभवानीरोड) यांनी फिर्याद दिली आहे. महाजन यांचा कॅम्प्युटर व लॅपटॉप विक्री आणि दुरूस्तीचा व्यवसाय आहे. मगळवारी (दि.२०) संगणक दुरूस्तीसाठी ते अमृतधाम भागात गेले होते. काम आटोपून ते दुचाकीने आरटीओ कार्यालय परिसरात निघाले होते.
अमृतधाम चौफुली भागात एका वाटसरूने त्यांच्याकडे लिफ्ट मागितल्याने ही घटना घडली. डबलसिट पाठीमागे बसलेल्या अनोळखी तरूणाने महाजन यांच्या पाठीला लावलेल्या बॅगेच्या पुढील कप्यातून सुमारे २८ हजाराची रोकड असलेले कागदी पाकिट चोरून नेले. अधिक तपास हवालदार कैलास शिंदे करीत आहेत.
सिडकोत घरफोडीत…चोरट्यांनी ८० हजार केले लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– सिडकोतील तानाजी चौकात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ८० हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माया रमेश पवार (रा.स्वामी समर्थ केंद्रामागे,तानाजीचौक) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पवार कुटूंबिय सोमवारी (दि.१९) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली.
अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून हॉलमधील अलमारीत ठेवलेली १ हजार ५०० रूपयांची रोकड सोन्याचांदीचे दागिणे व ब्ल्युट्यूब स्पिकर असा सुमारे ७९ हजार ६०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.