नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केवायसी करण्याच्या बहाण्याने भामट्यांनी क्रेडिट कार्डच्या माध्यमातून एकास पावणे चार लाख रूपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. लिंक ओपन करण्यास भाग पाडून सदर व्यक्तीच्या दोन क्रेडिट कार्ड वरून या रकमा ऑनलाईन पध्दतीने वळविण्यात आल्या असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारत शिवाजी रौंदळ (रा.वज्रेश्वरीनगर जेलरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. रौंदळ यांच्याशी गेल्या बुधवारी (दि. १४) भामट्यांनी संपर्क साधला होता. ९१९३६१४२०००७ व ९१९८३२५३६४१९ मोबाईलधारकाने आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड डिपार्टमेंट मधून बोलत असल्याचे सांगत आमच्या बँकेच्या क्रेडिट कार्डवर चांगली आॅफर असल्याची बतावणी करीत केवायसीच्या बहाण्याने ही फसवणुक केली.
रौंदळ यांचा विश्वास संपादन करीत भामट्यांनी लिंक पाठून त्यात गोपनिय माहिती भरण्यास भाग पाडले. डाऊनलोड केलेल्या अॅपमधील कस्टमर सपोर्ट या ऑप्शनवर रौंदळ यांनी क्लीक केले असता त्यांच्या एसबीआय आणि आरबीएल क्रेडीट कार्ड वरून सुमारे ३ लाख ८५ हजार २४४ रूपयांची रक्कम परस्पर लांबविण्यात आली. अधिक तपास निरीक्षक नाईकवाडे करीत आहेत.