नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- व्यावसायीक कर्ज काढून देण्याच्या मोबदल्यात भामट्याने एका व्यावसायीकास साडे नऊ लाख रूपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. कर्ज मंजूरीचे बनावट पत्र पाठवून भामट्याने प्रोसेसिंग व अन्य कारणे दाखवून फी स्वरूपात ही रक्कम स्विकारली असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जितेंद्र श्रावण चव्हाण असे व्यावसायीकास गंडा घालणा-या संशयिताचे नाव आहे. याबाबत अमोल अशोक गो-हे (रा.भक्तीधाम अपा.नर्सिंग कॅालेज मागे इंदिरानगर) या व्यापा-याने फिर्याद दिली आहे. दोहे यांची गेल्या डिसेंबर महिन्यात संशयिताशी भेट झाली होती. यावेळी संशयिताने वेगवेगळया बँकामधून कर्ज उपलब्ध करून देत असल्याची बतावणी केल्याने चव्हाण यांनी त्यास व्यवसाय वृध्दीसाठी कर्जाबाबत बोलणी केली.
सुदर्शन लॉन्स भागातील एका गाळयात कर्जासाठी लागणारी कागदपत्र सुपूर्द करण्यात आल्यानंतर अल्पावधीतच संशयिताने गो-हे यांच्या मोबाईलवर बनावट कर्ज मंजूरीचे पत्र पाठवून ही फसवणुक केली. गो-हे यांचा विश्वास संपादन होताच संशयिताने प्रोसेसिंग फी सह वेगवेगळी कारणे सांगून गो-हे यांच्याकडून सुमारे ९ लाख ६० हजार रूपये उकळले. मात्र आठ महिने उलटूनही पदरात कर्जाची रक्कम न पडल्याने गो-हे यांनी संबधीत बॅकेशी संपर्क साधला असता फसवणुकीचा हा प्रकार समोर आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अंकोलीकर करीत आहेत.