नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर खूनाच्या घटनेने हादरले आहे. पंचवटीत मेरी परिसरातील तारवालानगर येथे चक्क एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. धारधार शस्त्राने हा खून करण्यात आल्यामुळे नाशिक हादरले आहे. गगन प्रवीण कोकाटे (२८) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
या घटनेनंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी पोलिसांना गगन याच्या खिशातून एक चिट्ठी मिळाली आहे. दरम्यान ही हत्या प्रथमदर्शनी प्रेम प्रकरणातून झाली असल्याचा संशय वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी व्यक्त केला आहे.
मंगळवारी मध्यरात्री खून
मेरी कंपाऊंड परिसरातील मराठा समाजाच्या वस्तीगृहाबाहेर मंगळवार मध्यरात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात संशयितांनी डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून ही हत्या केली. बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास काही नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात गगन याचा मृतदेह आढळून आल्याने त्यांनी पंचवटी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर खून झाल्याचे उघडकीस आले. या घटनेनंतर पोलिसांनी एक पथक तात्काळ संशयिताच्या मागावर पाठवले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.