नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- घरासमोर करण्यात आलेल्या कॉक्रेटच्या ओल्या रस्त्यावरून दुचाकी नेण्यास मनाई केल्याने चार जणांच्या टोळक्याने दोघा भावांना बेदम मारहाण केल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील केवलपार्क भागात घडली. या घटनेत लोखंडी रॉडचा वापर करण्यात आल्याने एक भाऊ जखमी झाला असून दुस-याच्या गळयातील सोनसाखळी तुटून गहाळ झाली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कासिम, अनस, रशिद चौधरी व आदिल चौधरी अशी दोघा भावांना मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत रमजान मुसा पिंजारी (३१ रा.केवलपार्क सोसा.केवलपार्क सातपूर अंबड लिंकरोड) यांनी फिर्याद दिली आहे. केवलपार्क भागात कॉक्रेटी करणाचे काम सुरू आहे. या रस्त्यावरून संशयित रविवारी (दि.१८) सायंकाळच्या सुमारास मोटारसायकल घेवून जात असतांना तक्रारदार पिंजारी यांनी हटकल्याने ही घटना घडली.
ओल्या सिमेंट रस्त्यावरून दुचाकी घेवून जावू नका असा सल्ला दिल्याने संतप्त टोळक्याने पिंजारी व त्यांचा भाऊ शाकिर पिंजारी यांना शिवीगाळ व दमदाटी करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. रशिद चौधरी याने शाकिर पिंजारी यांना जीवे मारण्याची धमकी देत हातावर लोखंडी रॉडने मारहाण केल्याने ते जखमी झाले असून यावेळी झालेल्या झटापटीत रमजान पिंजारी यांच्या गळय़ातील तीन तोळे वजनाची सोनसाखळी तुटून गहाळ झाली आहे. अधिक तपास हवालदार टिळेकर करीत आहेत.
सहप्रवाशाने डल्ला मारला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-लॉजमध्ये थांबलेल्या प्रवाशाच्या पाकिटासह मोबाईलवर बेंगलोर येथील सहप्रवाशाने डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना शगुन हॉटेल जवळील डॉरमेट्री लॉजिंग येथे घडली असून, भामट्याने पाकिटातील एटीएम कार्डचा वापर करीत तब्बल दोन लाख ६ हजार ५०० रूपये लांबविले आहेत. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय के. (रा.चीमासंद्रा,विरगोनगर बंगलोर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित भामट्याचे नाव आहे. याप्रकरणी परमेश्वर जानोबा चव्हाण (मुळ रा.उदगीर जि.लातूर हल्ली पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. चव्हाण कामानिमित्त शहरात आले होते. बुधवारी (दि.१७) दुपारी ते विश्रांतीसाठी शगुन हॉटेलजवळील डॉरमेट्री लॉजिंगमध्ये थांबले असता ही घटना घडली. जनरल रूममध्ये बॅग ठेवून ते फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये गेले असता ही घटना घडली.
लॉज सोडण्याच्या तयारीत व चव्हाण यांनी बॅग ठेवलेल्या बेडवर मुक्कामी राहिलेल्या संशयिताने चार्जिंगला लावलेला मोबाईल आणि बॅगेतील पाकिट चोरून नेले. चोरून नेलेल्या पाकिटातील एटीएम कार्डचा वापर करीत भामट्यांनी वेगवेगळया एटीएम बुथमधून सुमारे एक लाख रूपये काढले असून ऑनलाईन ९५ हजाराची रक्कम दुस-या बँक खातेदाराच्या अकाऊंटमध्ये पाठवून ती परस्पर काढून घेतली आहे. अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.